कंत्राटदाराच्या जाचाला कंटाळून सफाई कामगाराची आत्महत्या
बेळगाव :
कंत्राटदाराच्या जाचाला कंटाळून ज्योती नगर, गणेशपूर येथील एका सफाई कामगाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली. आत्महत्या केलेल्या सफाई कामगाराचे नाव शशिकांत सुभाष ढवळे (वय 28, रा. ज्योतीनगर गणेशपुर) असे आहे.
याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, शशिकांत हा गेल्या दहा ते बारा वर्षापासून महानगरपालिकेत सफाई कामगार म्हणून काम करत होता. मध्यंतरी त्याने आपल्या कंत्राटदाराकडून 80 हजार रुपये व्याजाने घेतले होते. त्यातील 50 हजार रुपये परतही केली. केवळ 30 हजार रुपये देणे बाकी असल्याने कंत्राटदाराने एक लाख 50 हजार आकारले होते. आणि इतक्या व्याजासह सदर रक्कम देणे शशिकांतला शक्य नव्हते. त्यामुळे कंत्राटदार त्याचा पगारही कापत होता. त्याचबरोबर त्याचे बँक पासबुकही स्वतःकडे ठेवून घेतले होते. त्यामुळे शशिकांतला घर चालवणे मुश्कील बनले होते. पत्नी व मुलांचा खर्च कसा करायचा या मानसिक तणावाखाली तसेच कंत्राटदाराचा वारंवार होणारा त्रास सहन न झाल्यामुळे शशिकांतने गळफास लावून आत्महत्या केली. शशिकांतच्या आत्महत्येला जबाबदार असलेल्या कंत्राटदाराची तक्रार जिल्हाधिकारी, कामगार आयुक्तालय तसेच महापालिका आयुक्त यांच्याकडे करणार आहे. तसेच कंत्राटदाराने शशिकांत याच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी आणि त्यांच्या पत्नीची सफाई कामगार म्हणून नियुक्ती करावी अन्यथा कंत्राटदारावर ऍट्रॉसिटी दाखल करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. सदर घटनेची कॅम्प पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.
मयत शशिकांत याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, चार मुले, विवाहित अंध भाऊ, वहिनी व त्यांची मुले असा परिवार आहे.