सार्वजनिक गणेश मंडळांच्या आणि मार्केट पोलिसांची बैठक
बेळगाव:
मार्केट पोलीस ठाण्या परिसरात गणेशोत्सव शांततेत साजरा व्हावा, म्हणून पोलिसांच्या वतीने गणेश मंडळांच्या प्रतिनिधींची बैठक मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजता पार पडली. यावेळी उत्सवात काय खबरदारी घेणे गरजेचे आहे, यासह अनेक गोष्टींवर पोलिसांनी सूचना केल्या. तसेच, गणेश मंडळांचे म्हणणेही ऐकून घेतले.
पोलिसांच्या माहितीनुसार, बेळगाव शहरात 170 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आहेत. प्रत्येक मंडळाचा उत्सव नियमानुसार व शांततेत व्हावा, यासाठी पोलीस प्रयत्न करत आहेत. गणेशोत्सव मंडळांचे प्रतिनिधी, शांतता कमिटीचे सदस्य, प्रतिष्ठित नागरिक यांच्या बैठकीत पोलिसांनी सूचना केल्या. त्यात परस्परांमध्ये सलोखा निर्माण करणारे देखावे सादर करा, देशभक्ती वाढीला लागेल, असे उपक्रम आयोजित करावे, अशी सूचना करण्यात आली.
मंडपाजवळ रहदारीला, नागरिकांना अडथळा होणार नाही ते पहावे, विसजर्नाच्या वेळेचे नियोजन करावे, तलावापासून महिला-लहान मुलांना तसेच पोहता येत नाही, अशांना दूर ठेवावे अशा सूचना करण्यात आल्या. प्रत्येक मंडळाने स्वयंसवेक नेमावे,
ज्या गणेशोत्सवाचा देखावा पाहण्यासाठी गर्दी अपेक्षित आहे तिथे स्त्री-पुरुषांसाठी वेगळी रांग ठेवा, विसर्जनाच्या मिरवणुकीतील वाहन चांगल्या स्थितीतील ठेवावे, उपदव करणाऱ्या मंडळींना दूर ठेवा, असेही सांगितल्याचे मार्केट पोलीस ठाण्याचे निरीक्षक एम के धामनवर यांनी सांगितले. गणेश मंडपाच्या परिसरात गैरप्रकार होऊ नयेत, उत्सवाच्या नियमांचे पालन व्हावे, विसर्जन मिरवणुकीचा मार्ग निश्चित करावा, वाहतूककोंडी होणार नाही, याची काळजी घ्यावी असेही प्रतिनिधींना सांगण्यात आले.
गणेश मंडळांच्य प्रतिनिधी विजय जाधव, रणजित पाटील, सुनील जाधव, राजकुमार खटावकर यांनी आपल्या सूचना यावेळी पोलिसांकडे मांडल्या. यावेळी श्रीनाथ पवार, संजय नाईक ,जोतिबा पवार, विनायक बावडेकर, अरुण पाटील, सुनील कणेरी, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.