सर्वोत्कृष्ट ‘झोनल स्मार्ट सिटी’ पुरस्कार बेळगाव स्मार्टसिटी लिमिटेडला
बेळगाव :
बेळगाव स्मार्टसिटी लिमिटेडला इंडिया स्मार्ट सिटी अॅवॉर्ड (आयएसएससी) चा सर्वोत्कृष्ट ‘झोनल स्मार्ट सिटी’ पुरस्कार जाहीर झाला. इंदोर (मध्यप्रदेश) येथे पुरस्काराचे वितरण 27 सप्टेंबर रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणार आहे. बेळगावात 25 जून 2015 रोजी सुरु केलेल्या स्मार्टसिटी योजनेचे उद्दिष्ट नागरिकांना मूलभूत सुविधा, स्वच्छ आणि शुद्ध वातावरण, चांगले जीवनमान प्रदान करणे आहे (fourth edition of the India Smart Cities Award Contest (ISAC)).
बेळगाव शहरासह देशातील 100 स्मार्ट शहरांनी गतिशीलता, ऊर्जा, पाणी, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, सामाजिक पायाभूत सुविधा, स्मार्ट गव्हर्नन्स आदी संबंधित विविधक्षेत्रांत प्रकल्प हाती घेतले आहेत. भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयाच्या स्मार्टसिटी योजनेंतर्गत इंडिया स्मार्टसिटी अॅवॉर्ड स्पर्धा (आयएसएसी) आयोजित केली जाते. या योजनेंतर्गत सुरु केलेल्या महत्त्वाच्या उपक्रमांपैकी हा एक उपक्रम आहे.
आयएसएसी 100 स्मार्ट शहरांत कायमस्वरूपी विकासाला चालना देणारी तसेच सर्व समावेशक, न्याय, सुरक्षितता, आरोग्यदायी आणि सहयोगी शहरांना प्रोत्साहन देणारी शहरे पुरस्कृत करते. स्मार्टसिटी योजनेच्या सर्वोच्च समितीद्वारे प्रत्येक पुरस्कारासाठी तीन प्रस्ताव ठेवले जातात. यात देशातील एकूण 845 अर्जांपैकी 5 पुरस्कार श्रेणीत 66 अंतिम विजेते घोषित केले आहेत.