एनईपी रद्दच्या निर्णयाविरोधात अभाविपचे राज्यव्यापी आंदोलन
बेळगाव :
कर्नाटक सरकारने पुढील वर्षापासून राज्यातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) रद्द करण्याचा निर्णय घेतल्याच्या निषेधार्थ अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आज गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात आले. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात बेळगाव शहर शाखेतर्फे आज गुरुवारी सकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी राणी कित्तूर चन्नम्मा सर्कल येथे सरकार विरोधात जोरदार निदर्शने केली. यावेळी एनईपी रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात घोषणाबाजी करत “वंदे मातरम, बोलो भारत माता की जय” च्या घोषणा देण्यात येत होत्या. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून निवेदन सादर करण्यात आले.
मोर्चामध्ये शहरातील विविध महाविद्यालयांचे विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्य सरकारचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द करण्याचा हा निर्णय आतताईपणाचा असल्याचे सांगत एनईपी धोरण रद्द करण्यापूर्वी शिक्षण तज्ञांचा सल्ला घेण्यात आला आहे का असा प्रश्न यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. अनेक शिक्षण तज्ञांशी मान्यवरांशी सखोल चर्चा करून हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अमलात आणले जात आहे असे असताना राज्य सरकार कोणत्या आधारावर राज्यातील एनईपी रद्द करत आहे, असा प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आला.
एनईपीचे सर्वप्रथम अंमलबजावणी 2020-21 मध्ये कर्नाटक राज्यात झाली. आता सर्व महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये यांनी तिची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. त्यानुसार परीक्षा देऊन विद्यार्थी पदवीधर होत आहेत यांनी ती रद्द केल्यास पुढे या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणता निर्णय घेतला जाणार एनईपी रद्द करण्यापूर्वी सरकारने या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार केला आहे का? आजच्या घडीला विद्यार्थ्यांच्या अनेक ज्वलंत समस्या आहेत त्यांच्याकडे राज्य सरकार डोळेझाक करत आहे. सर्व सोडून फक्त राष्ट्रीय शैक्षणिक धोरण रद्द करण्याचा हट्ट योग्य नाही. परवा राज्य सरकारने विद्यापीठाच्या उपकुलगुरूंची बैठक घेतली आहे मात्र एनईपी रद्द करण्याचा निर्णय जाहीर झाल्यानंतर कुलगुरूंची बैठक घेण्यामागचा हेतू काय? असा प्रश्न उपस्थित करत घडीला देशातील शिक्षण एका दिशेने चालले आहे तर कर्नाटक राज्यातील शिक्षण दुसऱ्या दिशेने चालले आहे असे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या एका पदाधिकाऱ्यांनी म्हणत आपली नाराजी व्यक्त केली.