गणेश उत्सवासाठी 15 दिवस आधी ‘सिंगल विंडो’ – पोलीस आयुक्त
बेळगाव :
बेळगाव शहरातील सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळांना येत्या श्री गणेशोत्सवासाठी आवश्यक असणारी विविध खात्यांची लेखी परवानगी मिळणे सोयीचे जावे यासाठी उत्सवाच्या 15 दिवस आधी ‘सिंगल विंडो’ अर्थात एक खिडकी सुविधा सुरू केली जाईल असे ठोस आश्वासन देण्याबरोबरच गणेशोत्सव सुरळीत शांततेने पार पडावा यासाठी सर्व गणेशोत्सव मंडळांची संयुक्त बैठक घेण्याबरोबरच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या व्याप्तीतील मंडळाच्या बैठका घेतल्या जातील, असे शहर पोलीस आयुक्त डॉ. एस. एन. सिद्धरामप्पा यांनी स्पष्ट केले.
आज मंगळवारी सकाळी पोलीस आयुक्तालयाच्या सभागृहामध्ये पोलीस अधिकारी आणि मध्यवर्तीय सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ व लोकमान्य टिळक सार्वजनिक श्री गणेशोत्सव महामंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. सदर बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून पोलीस आयुक्त बोलत होते. प्रारंभी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त एस. टी. शेखर यांनी सर्वांचे स्वागत केले. बैठकीत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी श्री गणेशोत्सव दरम्यान उद्भवणाऱ्या समस्यांची माहिती दिली. सर्वप्रथम महामंडळाचे जनसंपर्क प्रमुख विकास कलघटगी यांनी सिंगल विंडोचा मुद्दा उपस्थित केला.
शहरात 378 सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ आहेत. त्यांच्या सोयीसाठी दरवर्षी सिंगल विंडो सुविधा उपलब्ध करून दिली जाते. मात्र त्या ठिकाणी पोलीस वगळता हेस्कॉम, महापालिका, वनखाते वगैरे संबंधित अन्य खात्यांपैकी काहींचे अधिकारी उपस्थित असतात कांही नसतात. त्यामुळे आपले कामधंदे सोडून विविध परवानग्यांसाठी आलेल्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची गैरसोय होते. यासाठी सिंगल विंडोच्या ठिकाणी निर्धारित वेळेत संबंधित सर्व खात्याचे अधिकारी हजर राहतील अशी व्यवस्था करावी. तसेच विविध परवानग्या मिळवण्यासाठी पदाधिकाऱ्यांना कसा त्रास सहन करावा लागतो याची माहिती देऊन परवानगी मिळण्याची प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी जाचक अटी नियम लागण्यात येऊ नयेत. तसेच उत्सवाच्या तोंडावर सिंगल विंडो सुविधा सुरू न करता ती 15 दिवस आधी सुरू करावी जेणेकरून सर्व मंडळांची चांगली सोय होईल, अशी मागणी कलघटगी यांनी केली.
विकास कलघटगी यांच्या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देताना पोलीस आयुक्त डॉ.सिद्धारामप्पा यांनी त्यांच्या मागण्या तात्काळ मान्य करून श्री गणेशोत्सवाच्या 15 दिवस आधी शहरातील सर्व आठ पोलीस ठाण्याच्या ठिकाणी सिंगल विंडो सुविधा सुरू केली जाईल. तसेच गणेशोत्सव मंडळांना आवश्यक असलेल्या परवानग्या मिळवण्यासाठी त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल, असे ठोस आश्वासन दिले.
याखेरीज विकास कलघटगी यांनी गणेश उत्सवा दरम्यान उद्भवणाऱ्या समस्याचे निवारण करण्यासाठी पोलीस, हेस्कॉम आणि वन खात्यांमध्ये समन्वय राखला जावा. कारण श्री गणेशाच्या आगमन आणि विसर्जनाचा मार्ग आधीच निश्चित झालेला असताना देखील त्या मार्गावरील झाडाच्या फांद्या, विजेच्या तारा वगैरे अडथळे संबंधित खात्याकडून दूर केले जात नाहीत. या अडथळ्यांमुळे एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून संबंधित खात्याकडून मार्गावरील अडथळे दूर करून गणेशाचे आगमन व प्रस्थान सुरळीत होईल अशी व्यवस्था करावी अशी सूचना केली. यावर बोलताना पोलीस आयुक्तांनी यंदा गणेशोत्सव काळातच मुस्लिम बांधवांचा ईद सण आला आहे. त्यांची मिरवणूक दुपारपर्यंत संपते. शहरातील श्री सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी मात्र विसर्जन मिरवणुकीमध्ये वेळेवर सहभागी व्हावे. तसेच सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मिरवणुकीत खंड न पडता ती सलग पार पाडावी. गणेशोत्सव काळात व मिरवणुकी प्रसंगी डॉल्बीचा वापर केला जाऊ नये. यंदाचा गणेशोत्सव सर्वांनी डॉल्बी विरहित साजरा करावा, त्या ऐवजी संस्कृती कार्यक्रम आणि पारंपारिक वाद्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे आवाहन पोलीस आयुक्त डॉ सिद्धारामपा यांनी केले. त्याचप्रमाणे पुन्हा एकदा सर्व मंडळांची संयुक्त बैठक घेण्याबरोबरच प्रत्येक पोलीस ठाण्याच्या ठिकाणी त्या त्या व्याप्तीतील सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व सदस्यांच्या बैठका घेतला जातील. त्यावेळी संबंधितांनी आपापल्या समस्या मांडव्यात जेणेकरून त्यांचे निवारण करणे सुलभ जाईल, असे त्यांनी सांगितले.