हेस्कॉमच्या रेल्वेस्थानक व नेहरूनगर येथील कार्यालयांमध्ये दोन चार्जिंग स्टेशन.
बेळगाव :
हेस्कॉम कार्यालयात या आणि आपल्या इलेक्ट्रिक वाहनांचे चार्जिंग मोफत करून घ्या, अशी सवलत हेस्कॉमने 15 ऑगस्टपासून सुरू केली आहे. शहरातील रेल्वेस्थानक व नेहरूनगर येथील हेस्कॉम कार्यालयांमध्ये इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आले असून कोणालाही मोफत चार्जिंग करता येणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी हेस्कॉमकडून पहिल्यांदाच असा उपक्रम राबविण्यात आला आहे.
केंद्र व राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान दिले जाते. इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढल्यास पेट्रोलपंपाप्रमाणे जागोजागी चार्जिंग स्टेशन उभारावी लागणार आहेत. यासाठी तीन वर्षांपूर्वी हेस्कॉमकडून बेळगाव व हुबळी विभागात सर्व्हे करण्यात आला होता. ज्या ठिकाणी विद्युत स्टेशनची गरज आहे, त्या ठिकाणी उभारणी करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. हेस्कॉमच्या रेल्वेस्थानक व नेहरूनगर येथील कार्यालयांमध्ये दोन चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आली आहेत.
नागरिकांना कार्यालयात गेल्यानंतर स्टेशनमध्ये आपली दुचाकी मोफत चार्जिंग करता येणार आहे. एका दुचाकीला पूर्ण चार्जिंग होण्यासाठी अडीच तासांचा कालावधी लागतो. 24 तास हे स्टेशन सुरू ठेवले जाणार आहे. कार्यालयीन कामकाजाव्यतिरिक्त इतर वेळीही याठिकाणी नागरिकांना वाहन चार्जिंग करून घेता येईल. अशी सुविधा शहराच्या इतर भागातही लवकरच केली जाणार आहे.
जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते मंगळवारी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मोफत चार्जिंग स्टेशनचे उदघाटन करण्यात आले. ग्राहकांना मोफत चार्जिंग करता येणार असल्याने इलेक्ट्रिक वाहन वापरकर्त्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. भविष्यातील इंधनाची गरज ओळखता हेस्कॉमचा हा स्तुत्य उपक्रम असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी हेस्कॉमचे साहाय्यक कार्यकारी अभियंते संजीव हम्मण्णवर, विनोद करूर, ए. एम. शिंदे, सेक्शन ऑफिसर पवनकुमार यांच्यासह इतर उपस्थित होते.
भविष्यातील इंधनाचा धोका टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन दिले जात आहे. हेस्कॉमकडूनही या उपक्रमाला हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. रेल्वेस्थानक व नेहरूनगर येथील हेस्कॉम कार्यालयांमध्ये चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात आली आहेत. नागरिकांना या ठिकाणी मोफत चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. ए. एम. शिंदे (साहाय्यक कार्यकारी अभियंते, हेस्कॉम)