मनपा बैठक गाजणार …
बेळगाव:
सभागृहात ठराव करूनही मराठीतून सर्वसाधारण सभेची नोटीस काढण्यात आली नाही. त्यामुळे मराठी भाषिकांना दुजाभावाची वागणूक देण्याच्या या प्रकाराचे महानगरपालिकेच्या बुधवार दिनांक 16 रोजीच्या बैठकीचे पडसाद उमटणार का, याबाबत शहरवासीयांचे लक्ष लागून आहे.
या बैठकीच्या विषय पत्रिकेत अनेक विषयांचा समावेश असून त्यामध्ये मराठी ठरावावर चर्चा होणार का, हे पाहावे लागणार आहे. मराठीतून कागदपत्रे देण्याचा निर्णय गेल्या महिन्यातील सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता.
याआधीही महापालिकेने त्रिभाषा धोरणाचा अवलंब केला होता. गेल्या बैठकीत ठराव होऊनही महिनाभरातच सत्ताधारी भाजपने मराठीच्या ठरावाला केराची टोपली दाखवली. नोटीस फक्त कन्नड आणि इंग्रजी भाषेत काढण्यात आली आहे. त्यामुळे म. ए. समितीच्या नगरसेवकांनी नोटीस स्वीकारली नाही. पण, या नगरसेवकांच्या घराच्या भींतीवर कन्नड नोटीस चिकटवण्यात आली.
त्यामुळे या विषयावर सभागृहात जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. म. ए. समितीचे नगरसेवक आंदोलन करण्याची शक्यता आहे. विषय पत्रिकेत 18 विषय आहेत.
त्यामध्ये कायदा सल्लागारांना मुदतवाढ देणे, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा खानापूर रोडवर पुतळा उभारणे, रामतीर्थनगरचे हस्तांतरण, बसव आर्ट गॅलरीचे काम थांबवणे, – बकुळ चौकाचे नामकरण वाल्मिकी चौक करणे अशा विषयांचा समावेश आहे.