बेळगाव रेल्वे स्थानका बाहेर “रेस्टॉरंट ऑन व्हील्स”
बेळगाव : बेळगावमधील रेल्वेस्थानकाचे काही महिन्यांपूर्वीच नूतनीकरण करण्यात आले. एखाद्या विमानतळ टर्मिनलप्रमाणे भव्य इमारत उभी करण्यात आली. यामुळे बेळगावच्या सौंदर्यामध्ये भर पडली. त्यामध्ये आता आणखी एक भर पडली आहे. रेल्वेने रेल्वेस्थानकाबाहेरच्या आवारात रेल्वेचा एक डबा प्रतिकात्मक स्वरुपात उभा केल्याने तो पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. देशातील महत्त्वाच्या रेल्वेस्थानकांबाहेर अनेक जुनी रेल्वेची इंजिने नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहेत.
बेळगाव रेल्वेस्थानकाबाहेर रेल्वेचा एक डबा बसविण्यात आला आहे. बुधवारी हा डबा बसविण्यात आल्याने पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. महिन्याभरापूर्वी रेल्वेचा डबा उभे करण्यासाठी रुळ घालण्यात आला होता. आता त्यावर डबा बसविण्यात आला आहे. अद्याप या डब्याच्या सुशोभिकरणाचे काम अपूर्ण असून लवकरच ते पूर्ण होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.