सावगांव येथे स्कूल बस उलटली: जीवित हानी नाही
बेळगाव : शाळकरी मुलांना घेऊन जाणारी अंगडी इन्स्टिट्यूटची स्कूल बस उलटली मात्र सुदैवाने कोणतीही जिवीतहानी घडली नाही. सदर अपघातात बसमधील दोन विद्यार्थी, एक महिला जखमी तर अन्य किरकोळ जखमी झाले आहेत.
मंगळवारी सकाळी 8.15 च्या सुमारास सांवगाव जवळ सावगाव बेनकनहळ्ळी रोडवर ही घटना घडली आहे. या अपघाताबद्दल समजलेली अधिक माहिती अशी सांवगाव, मंडोळी, बेनकनहळ्ळी, गणेशपुर आदी भागातील विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसला अपघात झाला आहे.
समोरून येत असलेल्या टेम्पोला चुकवताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने स्कूल बस रस्त्याशेजारी उलटली असून बस मधील दोन विद्यार्थी, एक महिला जखमी तर बहुतांश विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले असून सर्वजण सुखरूप आहेत. शाळा प्रशासनाने देखील घटनास्थळी जाऊन बसचा अपघात कसा झाला याची पाहणी करत चौकशी केली.