पहिल्या अग्निवीर तुकडीचा शानदार दीक्षांत समारंभ संपन्न
बेळगाव:
मराठा लाईट इन्फंट्रीच्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या पहिल्या अग्निवीर तुकडीचा शानदार दीक्षांत समारंभ मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंट सेंटर येथे पार पडला. दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्युनिअर लीडर्स विंगचे कमांडर मेजर जनरल आर. एस. गुरया उपस्थित होते.पहिल्या तुकडीतील १११ अग्नीवीरांनी एकतीस आठवड्याचे खडतर प्रशिक्षण पूर्ण केले आहे.
अग्नीवीरांनी शानदार संचलन करून मानवंदना देऊन देशाच्या रक्षणासाठी सर्वोच्च त्याग करण्याची शपथ घेतली. प्रशिक्षण कालावधीत सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या अग्नीवीरांना नाईक यशवंत घाटगे आणि व्हिक्टोरिया क्रॉस मेडल ज्युनिअर लीडर्स विंगचे कमांडर मेजर जनरल आर. एस. गुरया यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. प्रमुख पाहुणे ज्युनिअर लीडर्स विंगचे कमांडर मेजर जनरल आर.एस. गुरया यांच्या हस्ते युद्ध स्मारकाला पुष्पचक्र अर्पण केल्यावर दीक्षांत समारंभाची सांगता झाली.
मराठा लाईट इन्फंट्रीला शौर्याचा इतिहास आहे. आजवर या रेजीमेंटने अनेक युद्धात गौरवशाली कामगिरी बजावली आहे. भारतीय सैन्यातील एक जुनी रेजिमेंट अशी मराठा लाईट इन्फंट्रीची ओळख आहे. प्रशिक्षण कालावधीत मिळालेल्या प्रशिक्षणाचा उपयोग सेवा बजावताना होणार आहे. सैनिकी जीवनात शिस्तीला खूप महत्त्वाचे आहे असे उदगार ज्युनिअर लीडर्स विंगचे कमांडर मेजर जनरल आर. एस. गुरया यांनी अग्निविराना मार्गदर्शन करताना काढले. कार्यक्रमाला लष्करी अधिकारी, अग्निविरांचे कुटुंबीय आणि निमंत्रित उपस्थित होते.