रेड सिग्नल जंप करून 2 किमी धावली ट्रेन :दोन कर्मचारी निलंबित.
बिहार:
बिहारमध्ये रेल्वेचा निष्काळजीपणा समोर आला आहे. याठिकाणी एक ट्रेन सिग्नल तोडून जवळपास 2 किमी अंतरावर चुकीच्या ट्रॅकवर धावली. कैमुर येथील ही घटना आहे. जिथे जम्मू तावी सियालदह एक्सप्रेस (Jammu Tawi-Sealdah Express) रविवारी सकाळी चुकीच्या ट्रॅकवर धावत होती. कैमूरच्या भभुआ रोड स्टेशनजवळ ही ट्रेन चुकीच्या ट्रॅकवरून 2 किमी पुढे गेली. हे प्रकरण समोर येताच रेल्वेने लोको पायलट आणि सहायक लोको पायलट यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.
ज्यारितीने निष्काळजीपणा समोर आला तो मोठ्या अपघाताचे कारण बनला असता. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे. मिळालेल्या महितीनुसार, ही घटना मध्य रेल्वेच्या वेळेनुसार, सकाळी 7.07 वाजता घडली. जम्मूहून सियालदहला जाणारी ट्रेन भभुआ स्टेशनला प्लॅटफॉर्म नंबर 3 वर थांबायला हवी होती. परंतु लाल सिग्नल असतानाही ट्रेन चुकीच्या ट्रॅकवर गेली आणि 2 किमीपर्यंत धावली.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, चुकीच्या ट्रॅकवर धावताना सुदैवाने दुसरी ट्रेन त्या ट्रॅकवर नव्हती. सिग्नल तोडून ट्रेन पुढे जात असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरले. अनेक प्रवाशी जोरजोरात ओरडू लागले. महिला प्रवाशी रडायला लागल्या. त्यानंतर पायलटने इमरजेन्सी ब्रेक दाबून ट्रेन थांबवली.
या प्रकाराची माहिती मिळताच विभागीय संचालक राजेश गुप्ता हे घटनास्थळी पोहचले. त्यांनी ट्रेनच्या दोन्ही पायलटना तात्काळ निलंबित केले. ट्रेन चालवण्यासाठी अन्य टीमला पाचारण केले. अचानक झालेल्या या घटनेनंतर 3 तास प्रवाशांना विलंब झाला. सध्या या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश रेल्वेने दिले आहेत.