भाजपाची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; सी. टी. रवी यांना वगळले!
नवी दिल्ली :
भाजपाने पक्षाच्या बहुप्रतिक्षित संघटनात्मक पुनर्रचनेत, आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवीन केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली, ज्यात नऊ महिला आणि दोन मुस्लीम नेत्यांचा समावेश आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय कार्यालयाचे प्रभारी अरुण सिंह यांनी आज सकाळी ही यादी जाहीर केली ज्यात १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस, सह- संघटन महासचिव, १३ राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि सह- खजिनदार अशी रचना आहे. या पदाधिकाऱ्यांमध्ये ९ महिलांचा समावेश आहे. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीसांमध्ये एकाही महिलेला स्थान मिळालेले नसून १३ राष्ट्रीय उपाध्यक्षांपैकी पाच आणि १३ राष्ट्रीय सचिवांपैकी चार महिला आहेत.
भाजपाच्या या राष्ट्रीय कार्यकारिणीत महाराष्ट्रातील तिघांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यात राष्ट्रीय महामंत्री म्हणून विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. तर राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विजया रहाटकर, पंकजा मुंडे यांचाही कार्यकारिणीत समावेश करण्यात आला आहे. नुकतेच पंकजा मुंडे यांनी राजकारणापासून २ महिने बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना पुन्हा पक्षात सक्रीय होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता भाजपाच्या केंद्रीय पातळीवरून पंकजा मुंडे यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे