विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 23 वा पदवीदान सोहळा मंगळवारी, राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची उपस्थिती
बेळगाव:
बेळगाव येथील विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 23 वा पदवीदान सोहळा मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी साडेअकरा वाजता आयोजित करण्यात आला आहे. या पदवीदान समारंभाला विद्यापीठाचे कुलगुरू आणि राज्यपाल थावरचंद गेहलात यांच्यासह राज्याचे उच्च शिक्षण मंत्री डॉ. एम.सी सुधाकर, इंडियन इंस्टिट्युट ऑफ टेक्नोलोजी मद्रास संचालक प्रा. व्ही. कामकोटी (चेन्नई) हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती विद्यापीठाचे कुलगुरू विद्याशंकर यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिली. यावेळी पदवीदान समारंभ आणि विद्यापीठाच्या कामकाजासंदर्भात अधिक माहिती देताना प्रा. विद्याशंकर म्हणाले, विद्यापिठाने 25 वर्षात प्रथमच परीक्षा झाल्यानंतर अवघ्या सात दिवसात निकाल जाहीर केला आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकडे विशेष लक्ष देऊन विद्यापीठाचे काम जलद गतीने पार पाडले जात आहे. निकाल वेळेत जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाची चांगली सोय झाली आहे. नोकरी व्यवसाय करु इच्छिणार्या विद्यार्थ्यांनाही याचा लाभ होणार आहे. पुढील काळात विद्यापीठाच्या वतीने ऑनलाईन अभ्यासक्रम सुरू होत आहे असे ही त्यांनी सांगितले.
पदवीदान समारंभात श्री आदीचुनचूनगिरी महासंस्थान मठाचे जगद्गुरु श्री निर्मलानंदनाथ महास्वामी, राष्ट्रीय शिक्षण समिती ट्रस्ट चे सेक्रेटरी डॉ. ए. व्ही. एस. मुर्ती आणी मैसुर मर्कंटाईल कंपनी लि. बेंगळूरू चेअरमन एच. एस. शेट्टी यांना डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात येणार आहे. या समारंभात 550 विद्यार्थ्यांना पीएचडी पदवी बहाल करण्यात येणार आहे. सुवर्णपदक प्राप्त केलेल्या दहा विद्यार्थ्यांमध्ये सहाव्या क्रमांकावर बेळगावच्या केएलई डॉ. एम. एस. सी शेषगिरी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड टेक्नॉलॉजी विद्यार्थिनी अवंतिका सावकार चा समावेश आहे. कुलगुरू विद्याशंकर यांनी यावेळी स्पष्ट केले. विद्यापीठाचे रजिस्टार प्रा. बी. ई. रंगास्वामी आणि प्रा. टी. एन. श्रीनिवास यावेळी उपस्थित होते.