विजय दर्डा यांच्यासह तिघांना दिल्ली हायकोर्टाकडून अंतरिम जामीन मंजूर
नवी दिल्ली :
छत्तीसगडमधील कोळसा खाण वाटप कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झालेले माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा, त्यांचा मुलगा देवेंद्र दर्डा आणि आणखी एका आरोपीला यांना दिल्ली उच्च न्यायालयाने अंतरिम जामीन दिला आहे. दिल्लीतील विशेष कोर्टाने त्यांना बुधवारी (26 जुलै) दोषी ठरवून शिक्षा सुनावली होती.
विजय दर्डा यांचा चार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा 1999 ते 2005 या कालावधीमध्ये जेएलडी यवतमाळ यांना जे जुने ब्लॉक देण्यात आले होते त्याची माहिती लपवून पुन्हा यूपीए सरकारच्या काळामध्ये गैरमार्गाने कंत्राट मिळावल्याचा आरोप होता. यूपीए सरकारच्या काळात गाजलेल्या घोटाळ्यांमध्ये कोळसा घोटाळ्याचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. दिल्लीतील विशेष न्यायालयाने बुधवारी राज्यसभेचे माजी खासदार विजय दर्डा यांच्यासह मुलगा देवेंद्र दर्डा आणि जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रा. लि. संचालक मनोजकुमार जयस्वाल यांना कोळसा घोटाळा प्रकरणी चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. तसंच याच प्रकरणात निवृत्त कोळसा सचिव एच. सी. गुप्ता, दोन ज्येष्ठ अधिकारी के एस क्रोफा आणि के सी समरीया यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती.
13 जुलै रोजी राऊज एवेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश संजय बन्सल यांनी माजी राज्यसभा खासदार विजय दर्डा आणि पुत्र देवेंद्र दर्डा, माजी कोळसा सचिव एच सी गुप्ता, के एस क्रोफा, के सी सामरिया हे दोन प्रशासकीय अधिकारी, जेएलडी यवतमाळ एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक मनोज कुमार जैस्वाल यांना दोषी ठरवलं होतं. विशेष न्यायालयाने त्यांना आयपीसीच्या कलम 120 बी, 420 आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या इतर कलमांखाली दोषी ठरवलं. या प्रकरणी शिक्षेची सुनावणी 18 जुलै रोजी होणार होती, परंतु 26 जुलै रोजी शिक्षा सुनावणी झाली. ज्यात त्यांना चार वर्षांचा तुरुंगवास ठोठावण्यात आला.