ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकरांचे निधन
मुंबई :
विनोदी लेखक, ज्येष्ठ पत्रकार शिरीष कणेकरांचे मंगळवारी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. ते ८० वर्षांचे होते. त्यांच्यावर येथील हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. कणेकरांच्या निधनाने साहित्य विश्वासह पत्रकारिता क्षेत्रात पोकळी निर्माण झाली आहे. मूळ रायगड जिल्ह्यातील शिरीष कणेकरांचे बालपण मुंबईतील भायखळ्यात गेले. मुंबई विद्यापीठातून वकिलीचे शिक्षण घेऊन त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात काम केले. त्यांनी इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जर्नल या वृत्तपत्रात काम केले. त्यांनी महाराष्ट्र टाईम्स, सामनासह राज्यातील असंख्य मराठी वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन केले आहे. बहारदार वक्तृत्वशैली असलेले कणेकर महाराष्ट्रात सुपरिचित होते. त्यांनी सिनेमा, क्रिकेट आणि राजकारणावरही स्तंभलेखन केले. त्यांचे ‘कणेकरी’, ‘फिल्लमबाजी’, ‘शिरीषासन’ हे विनोदी लेख वाचकांना अंतर्मुख करत होते. त्यांच्या निधनाने पत्रकारितेसह साहित्यविश्वावर शोककळा पसरली आहे.