आ.अभय पाटील यांच्या नेतृत्त्वात श्रीराम कॉलनी परिसरात स्वच्छता मोहीम.
बेळगाव-
बेळगाव शहर परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सांडपाण्याचा प्रश्न पुन्हा निर्माण होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळच्या पावसात आदर्श नगर श्रीराम कॉलनी परिसरात स्वच्छतेचे काम हाती घेतले.
बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार दर रविवारी ठिकठिकाणी स्वच्छतेचे काम हाती घेतले जाते. त्याच अनुषंगाने आज आदर्श नगर श्रीराम कॉलनी परिसरात स्थानिक नगरसेवक मंगेश पवार यांच्या पुढाकाराने परिसरातील गटारी-रस्ते साफ करण्याचे काम हाती घेण्यात आले.
श्रीराम कॉलनी परिसरातील गटारी येथे पावसामुळे अनेक ठिकाणी साचलेला कचरा व सांडपाण्याचा निचरा होत नसल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष देऊन स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी परिसरातील गटारींची स्वच्छता केली, रस्त्यावरील खड्डेही बुजवले. या कामात आमदार अभय पाटील यांनी सहभाग घेतला होता.
या वेळी त्यांनी परिसरातील इतर नागरी समस्यांबाबतही स्थानिक नागरिकांशी चर्चा केली. त्यासोबत विविध विकास कामांची माहिती दिली. आजच्या स्वच्छता मोहिमेत नगरसेवक मंगेश पवार, नगरसेवक जयंत जाधव, प्रशांत कंग्राळकर यांच्यासह पन्नासहून अधिक कामगार स्वत: गटारी साफ करताना दिसले. श्रीराम कॉलनी परिसरात कार्यकर्त्यांनी स्वेच्छेने राबविलेल्या स्वच्छता मोहिमेबद्दल स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले.