शरद पवारांना पुन्हा हादरा ! 7 आमदारांचा अजितदादांना पाठिंबा
मुंबई :
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड करत भाजपसोबत सत्तेत सामील झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पक्षाध्यक्ष शरद पवारांना पंधरा दिवसांतच दुसरा मोठा धक्का दिला आहे. नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या 7 आमदारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा जाहीर केला आहे. एवढंच नव्हे तर नागालँडमधील आमदारांसह पक्षाच्या बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनीही अजितदादांना पाठिंबा दर्शविला. नागालँडमधील आमदारांच्या या भूमिकेमुळे अजितदादांचं पारड जड झालं आहे.
नुकत्याच झालेल्या नागालँडमधील विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 7 आमदार निवडून आले होते. या आमदारांनी नागालँडमध्ये सत्तेत आलेल्य भाजपला पाठिंबा दिलेला आहे. आता याच आमदारांनी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवारांना आपला पाठिंबा जाहीर करत या संदर्भातील पत्र जारी केले आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे.
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन गटाचे दोन वेगवेगळे मेळावे झाले होते. या मेळाव्यात दोन्ही गटांनी एकमेकांवर टीकेची झोड उठवली होती. तर राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पंधरा दिवसांच्या आतच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या मंत्र्यांनी शरद पवारांची दोन वेळा भेट घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकसंघ ठेवण्यासाठी प्रयत्न करण्याची विनंतीही त्यांनी साहेबांकडे केली होती. पण यावर शरद पवारांनी अद्यापही काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. असे असतानाच आता नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांनी अजित पवारांना पाठिंबा जाहीर केला. आहे. त्यामुळे यावर आता शरद पवार काय प्रतिक्रिया देतात, हे पाहणं महत्वाचं असणार आहे…