ट्रेकिंग पॉईंट असलेल्या इर्शाळगडावर दरड कोसळली; 8 जण मृत्युमुखी
रायगड :
रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळील इर्शाळवाडी गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते बुधवारी (19 जुलै) रात्री साडेदहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास इर्शाळगडावर दरड कोसळली आणि पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव उद्ध्वस्त झालं. या गावात 45 ते 50 घरांची वस्ती आहे, यातील 30 ते 40 घरातील लोक मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची माहिती मिळाली आहे.
मुंबई-पुणे जुना महामार्गावरुन जात असताना कर्जत आणि पनवेलच्या मधोमध इर्शाळगडला जाण्यासाठीचा रस्ता आहे. इर्शाळगड हा रायगडमधील प्रसिद्ध ट्रेकिंग पॉईंट आहे. खालापूरजवळून मोरबे डॅम मार्गे गावाकडे जाण्याचा रस्ता आहे. पावसाळ्यामुळे शनिवार आणि रविवारी ट्रेकर्सची पाऊलं इर्शाळगडाकडे वळतात. वीकेंडला गडावर मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. मात्र ऐन बुधवारी रात्री दरड कोसळल्याची घटना घडल्याने यात कोणताही पर्यटक किंवा ट्रेकर अडकलेला नाही. मात्र पायथ्याशी असलेलं इर्शाळवाडी गाव उद्ध्वस्त झालं. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इर्शाळवाडी हे गाव दरडग्रस्त यादीत येत नव्हतं, तरी देखील दुर्दैवाने पावसामुळे या गावावर दरड कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे.