खानापूरात पुला जवळ वृक्ष कोसळल्याने वाहतुक ठप्प
खानापूर :
खानापूर शहरासह तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाची चांगलीच हजेरी लागली आहे. त्यामुळे खानापूर शहराजवळील मलप्रभा नदीच्या पुला जवळील नगरपंचायतींच्या जॅक वेलला लागुन भला मोठा वृक्ष कोसळल्याने पणजी – बेळगांव महामार्गावरील वाहतूक बराच वेळ ठप्प झाली. पुलाच्या दोन्ही बाजूला वाहनाच्या रांगा लागल्या.
सध्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मंगळवारी दि. १८ रोजी लोंढा येथे विद्युत खांब कोसळले. ही घटना घडताच, दुपारी पणजी बेळगांव महामार्गावरील खानापूर शहराजवळील मलप्रभा नदीच्या पुला जवळील नगरपंचायतीच्या जॅकवेलला लागून असलेला भला मोठा वृक्ष कोसळल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. बराच काळ महामार्गावर वाहने थांबून राहिली. बऱ्याच उशीराने वृक्ष बाजुला हटविल्याने वाहतुक सुरळीत झाली. यावेळी जीवीतहानी झाली नाही.
खानापूर तालुक्यात पावसाळ्यात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे काही भागात झाडे उन्मळून पडणे, विद्युत खांबे मोडणे असे प्रकार घडत असतात. तेव्हा संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे जातीने लक्ष देऊन जनतेला सहकार्य करण्याची मागणी तालुक्यातील जनतेतुन होत आहे.