पूर्ववैमनस्यातून मित्रानेच केला खून
बेळगाव, :
पार्टीला नेऊन मित्रांनीच मित्राचा खात्मा केल्याची घटना हुंचेनहट्टी येथे घडली आहे. अरबाज रफिक मुल्ला (वय 22 राहणार हैदरअली चौक, पीरनवाडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून या खून प्रकरणी प्रसाद नागेश वडर (राहणार जन्नत नगर, पीरणवाडी) आणि प्रशांत रमेश कर्लेकर (राहणार सिद्धेश्वर गल्ली, पीरणवाडी) या संशयीताना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
चार वर्षांपूर्वी अरबाज मुल्ला याने गुटखा खाऊन प्रसाद वडर याच्या घरावर पिचकारी मारल्याने त्यांच्यात शाब्दिक वाद झाला होता. त्यानंतर पंधरा दिवसांपूर्वी अरबाज आणि प्रसाद दारू ढोसण्यासाठी पुन्हा एकत्र आले होते. दोघांनी दारू ढोसल्यानंतर पुन्हा दोघांमध्ये वाद झाला. यावेळी अरबाजने प्रसादला संपविण्याची धमकी दिली होती.
हा राग मनात धरून प्रसादने आपला मित्र प्रशांत याला सोबत घेऊन अरबाजचे घर गाठले. पार्टी करण्याच्या बहाण्याने त्यांनी अरबाजला घरापासून दूर हुंचेनहट्टी येथील एका खासगी कॉलेजच्या बाजूला असलेल्या खुल्या जागेत नेले आणि तेथे हातातील कड्याने अरबाजच्या डोक्यावर जोराचा प्रहार केला. कड्याच्या या फटक्याने अरबाज खाली कोसळला. यानंतर पुन्हा त्याच्यावर कड्याचे प्रहार करण्यात आले. यामध्ये अरबाजचा मृत्यू झाला असे सांगण्यात येते.