१३ व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव अजिंक्यपद स्पर्धेत बेळगावच्या व्यंकटेश ताशिलदारला कांस्य
बेळगाव :
मालदिव येथे झालेल्या १३ व्या दक्षिण आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेत बेळगावच्या व्यंकटेश ताशिलदार या व्यायामपटुने कांस्यपदक मिळवून भारताचा तिरंगा फडकविला.
दि. ५ ते ९ जुलैपर्यंत झालेल्या या स्पर्धेत ६५ किलो वजन गटात व्यंकटेशने तिसरा क्रमांक मिळविला. बेळगावच्याच प्रविण कणबरकरने ७० किलो गटात चौथा क्रमांक पटकावला. प्रशिक्षक प्रसाद बसरीकट्टी यांचे व्यंकटेशला मार्गदर्शन तसेच कर्नाटक बाँडी बिल्डर्स असोसिएशनचे प्रमुख अजित सिद्दण्णवर, सुनिल राऊत यांचे मार्गदर्शन लाभले.
व्यंकटेश हा भवानीनगर येथील रहिवासी व महापालिका कर्मचारी किशोर ताशिलदार यांच्या मुलगा होय. व्यंकटेशचे महाविद्यालयीन शिक्षण आरपीडी कॉलेजमध्ये झाले. बेळगावला परतल्यानंतर व्यंकटेशची भवानीनगर परिसरात भव्य विजयी मिरवणूक काढण्यात आली. या यशाबद्दल व्यंकटेशवर सर्व थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.