बापाकडून मुलाचा खून
बेळगाव :
सोमय्या महालिंगय्या हिरेमठ (वय २४, रा. हिडकल, ता. रायबाग) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी मृताचा वडील महालिंगय्या गुरुसिद्धय्या हिरेमठ (वय ५४) व भाऊ बसय्या महालिंगय्या हिरेमठ (वय २६) यांना अटक झाली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, सोमय्याला दारूचे व्यसन होते, त्यामुळे तो घरच्यांशी भांडण काढून त्रास द्यायचा. या त्रासाला घरचेही कंटाळले होते.
८ जुलै रोजी म्हणजे शनिवारी सोमय्या व घरच्या लोकांमध्ये जोराचे भांडण झाले. त्यावेळी वडील महालिंगय्या व मोठा मुलगा बसय्या यांनी सोमय्याच्या डोक्यात काठीने जोराचा प्रहार केला. त्यात सोमय्या जागीच मृत पावला. तो मृत झाल्याचे लक्षात येतात बाप-लेकाने घाईने मृतदेह येऊन त्याला अग्नी दिला.
त्यानंतर दोन दिवसांनी मुलाने व बापाने मिळून आपल्या दुसऱ्या मुलाला मारल्याची चर्चा गावात सुरू झाली. यामुळे पोलिसांनी स्वतःहून तपास सुरू केला. त्यावेळी दोघांनी मिळून खून केल्याचे कबूल केले. त्यानंतर ज्या ठिकाणी सोमय्याला जाळण्यात आले होते, तेथून हाडाचे अवशेष मिळवून पोलिसांनी ते न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत.
मद्यपी मुलाचा खून करून मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावणाऱ्या बाप-लेकाला हारुगेरी पोलिसांनी अटक केली. ८ जुलै रोजी घडलेल्या या खुनाचा पोलिसांनी तीन दिवसांत छडा लावला.