विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शाळा बसचालक निलंबित
बेळगाव :
सावगाव रस्त्यावर आध्यात्मिक गुरुच्या नावाने सीबीएसई माध्यमाची शाळा चालविली जाते. ही शाळा शहरापासून दूर असल्याने विद्यार्थ्यांची ने-आण करण्यासाठी शाळेने खासगी बसची सुविधा ठेवली आहे. या बसमध्ये असणारा चालक हा बस अत्यंत वेगाने चालवितो अशी तक्रार त्याच्याबद्दल होत्या.
एक विद्यार्थिनी या चालकाच्या गैरवर्तनाची शिकार ठरली. तिने स्वतःला सोडवून घेतले आणि टिचर याबाबत कल्पना दिली. मात्र, टिचर तू ही गोष्ट कोणालाही सांगू नकोस, घरी पालकांना याबाबत बोलू नकोस, असे त्या विद्यार्थिनीला सांगितले. त्या विद्यार्थिनीने आपल्या मैत्रिणींना याबद्दल कल्पना दिली. तेव्हा त्यातील एका विद्यार्थिनीने आपल्या आईकडे सांगितली. त्यानंतर सदर महिलेने ही बाब अतिशय गंभीर असल्याचे लक्षात घेऊन शाळा मुख्याध्यापिका व प्राचार्यांशी संपर्क साधला. तेव्हा आम्ही त्या चालकाला निलंबित केले आहे, असे त्यांना सांगण्यात आले.
विद्यार्थिनींशी गैरवर्तन करणाऱ्या शाळा बसचालकाबद्दल विद्यार्थिनींनी कल्पना देऊनसुद्धा त्यावर कारवाई न झाल्याबद्दल माध्यम प्रतिनिधींनी व सामाजिक कार्यकर्ते, राम बनवानी, अखिल भारतीय मानवाधिकार, जिल्हाध्यक्ष आणि अश्विनी लेंगडे, महिला अध्यक्षा, त्या शाळेत जाऊन व्यवस्थापनाला जाब विचारले, यावेळी प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका व माध्यमिकच्या प्राचार्यांनी बरीच सारवासारव केली. परंतु, नंतर मात्र, त्या बसचालकाला आपण निलंबित केले असून त्याच्यावर कारवाई करू, असे स्पष्टीकरण दिले.
या चालकाचे दुष्कृत्य पोक्सो कायद्याचे उल्लंघन करणारे असून त्याच्याविरोधात पोलीस स्थानकामध्ये रितसर तक्रार नोंदविण्याचा आग्रह पत्रकारांनी धरला. तेव्हा आपण तक्रार निश्चित करू असे आश्वासन देण्यात आले.
चालकाचे हे वर्तन गुन्हा ठरतो आहे, तरीही आपण पोलीस स्थानकात तक्रार का केली नाही? उद्या हा चालक आणखी कोणत्या तरी शाळेत जाऊन याच प्रकारची पुनरावृत्ती करेल, हे लक्षात आणून देऊन त्यासाठीच पोलीस स्थानकात तक्रार आवश्यक आहे, असे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिले. पत्रकारांनी दबाव आणताच आपण पोलीस स्थानकात आता तक्रार करू, असे आश्वासन त्यांनी दिले.