येळ्ळूर येथील खुन प्रकरणी तीन संशयित ताब्यात.
बेळगाव :
येळ्ळूर (ता. बेळगाव) येथील सेंट्रिंग कामगाराच्या खुनाचे धागेदोरे सापडले असून टिळकवाडी पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. गुरुवारी सकाळी बॅ. नाथ पै नगर, अनगोळ येथील काळा तलावाजवळील शेतवडीत संजय तुकाराम पाटील (वय 35, रा. येळ्ळूर) या सेंट्रिंग कामगाराचा मृतदेह आढळला होता. अज्ञातांनी तीक्ष्ण हत्याराने खून करून त्याचा मृतदेह शेतात टाकल्याचे उघडकीस आले होते.टिळकवाडी पोलीस स्थानकात खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक दयानंद शेगुणशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खून प्रकरणाचा तपास हाती घेतला आहे.
उपलब्ध माहितीनुसार खून झालेल्या संजयच्या तिघा मित्रांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले असून शुक्रवारी त्यांची कसून चौकशी करण्यात येत होती. क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादावादीनंतर संजयचा खून झाल्याची प्राथमिक माहिती उघडकीस आली असून याप्रकरणात पाच ते सहा जणांचा सहभाग असल्याचा संशय आहे. यासंबंधी पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांच्याशी संपर्क साधला असता खुनाचे धागेदोरे सापडले आहेत. चौकशी सुरू आहे. एक-दोन दिवसांत संशयितांना अटक करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.