२४ आमदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ
बंगळूर :
कर्नाटकातील काँग्रेस सरकारचा आज शनिवारी मंत्रिमंडळ विस्तार झाला. बंगळुरातील राजभवन येथे २४ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. त्यात एच. के.पाटील, कृष्णा बायरेगौडा, एन चालुवर्यस्वामी, के व्यंकटेश,डॉ. एच. सी. महादेवप्पा, ईश्वर खांद्रे, कायथसंद्र एन. राजन्ना, दिनेश गुंडू राव, शरणबसप्पा दर्शनापूर, शिवानंद पाटील, तिम्मापूर रामाप्पा बाळाप्पा, एस. एस.मल्लिकार्जुन, शिवराज संगप्पा तंगडगी, डॉ. शरण प्रकाश रुद्रप्पा पाटील, मंकल वैद्य, लक्ष्मी हेब्बाळकर, रहीम खान, डी. सुधाकर, संतोष लाड, एनएस बोसेराजू, सुरेश बी. एस., मधू बंगारप्पा, डॉ. एम. सी. सुधाकर आणि बी. नागेंद्र यांचा समावेश आहे. त्यांना राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार गेले दोन दिवस दिल्लीत होते. सिद्धरामय्यांनी सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर २४ जणांची यादी निश्चित केली होती. मंत्रिमंडळ विस्तारासाठी सिद्धरामय्यांनी १९, शिवकुमारांनी १६ आणि खर्गे यांनी ५ आमदारांच्या नावांची शिफारस केली होती; मात्र एकूण २४ जागाच रिक्त असल्याने तिघांच्याही याद्यांमध्ये काटछाट करण्यात आली.
मंत्री सतीश जारकीहोळी आणि लक्ष्मी हेब्बाळकर यांचे उद्या होणार जंगी स्वागत
राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील दुसर्या टप्प्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी झाला आहे. या मंत्रिमंडळ विस्तारानंतरच मंत्र्यांना खातेवाटप करण्यात येणार आहे. दरम्यान मंत्री पदाची शपथविधी शनिवारी पार पडला. यामध्ये बेळगावचे आ. सतीश जारकीहोळी आणि आ लक्ष्मी हेंबाळकर या दोघांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. शपथ घेतल्यानंतर रविवारी त्यांचे बेळगावात आगमन होणार आहे .त्यामुळे त्यांच्या स्वागताचा जंगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या नेतृत्वात सरकारमधील उर्वरित 24 मंत्रिपदांसाठी 80 हून अधिक इच्छुक आमदारांनी लॉबिंग सुरू केले होते. इच्छुकांकडून रोज मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार व पक्षश्रेष्ठींच्या भेटीगाठींवर जोर दिला. सर्व इच्छुक आमदार आपल्यापरीने प्रयत्न करत होते. आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांना मंत्रीपद मिळाले असून खातेवाटप त्यानंतर होणार आहे.