ट्रकने रस्त्याच्या बाजुला थांबलेल्या दुचाकींना’उडवले
बेळगाव : ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने रस्त्याच्या बाजुला थांबलेल्या दुचाकींना उडवल्याची घटना बुधवारी (दि. २४)रात्री नऊच्या सुमारास शनिवार खुटावर घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पाच दुचाकींचे मोठे नुकसान झाले.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, चन्नम्मा चौकातून शनिवार खुटाकडे निघालेल्या ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे, चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. ट्रक शनिवार खुटावर रस्त्याच्या बाजुला थांबलेल्या दुचाकींवर चढला. त्यात पाच दुचाकींचे मोठे नुकसान झाले. या रस्त्यात मोठी वर्दळ असते. अशात ब्रेक निकामी झालेल्या ट्रकमुळे मोठा धोका निर्माण झाला असता. पण, ट्रक दुचाकींना आदळून थांबल्याने अनर्थ टळला. मात्र,दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे, उशिरापर्यंत शनिवार खूट परिसरात गर्दी झाली होती. अवजड वाहनांना बंदी असतानाही हा ट्रक शहरात कसा आला, असा सवाल लोकांतून उपस्थित करण्यात येत होता. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली होती.