कर्नाटक राज्य सरकारचा शपथविधी संपन्न
बेंगलोर वृत्तसंस्था
कर्नाटकमध्ये आज नव्या सरकारची स्थापना झाली आहे. काँग्रेसचे कर्नाटकमधील वरिष्ठ नेते सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्रीपदाची तर कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के.शिवकुमार यांनी उपसमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. राज्याचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांनी नूतन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ सदस्यांना शपथ देवविली. तसेच त्यांच्या समवेत बेळगाव जिल्ह्यातील काँग्रेस नेते आणि केपीसीसीचे कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी देखील शपथ घेतली. राज्याच्या नवीन मंत्रिमंडळात डॉ. जी. परमेश्वर, के एच मुनियप्पा, के.जे. जॉर्ज,एम.बी. पाटील, प्रियांक खरगे, रामलिंग रेड्डी, जमीर अहमद खान यांनी देखील मंत्री पदाची शपथ घेतली. कर्नाटकमध्ये काँग्रेसला बहुमत मिळाल्यानंतर आता पक्षाने राज्यात सरकार स्थापन केले आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी, माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षांमधील नेत्यांनी या शपथविधीला हजेरी लावली होती. प्रामुख्याने शरद पवार, अशोक गहलोत यांची उपस्थिती कार्यक्रमाला होती.गुरुवारी झालेल्या काँग्रेस विधिमंडळ पक्षाने औपचारिकरीत्या सिद्धरामय्या यांची नेता म्हणून निवड केली. त्यानंतर त्यांनी राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेचा दावा केला होता. दरम्यान, बंगळुरुमधील कंठीरवा स्टेडियम मध्ये हा शपथविधी सोहळा पार पडला. सिद्धरामय्या हे दुसऱ्यांदा राज्याच्यामुख्यमंत्रीपदी विराजमान झाले . शपथविधीनंतर बोलताना सिद्धरामय्या यांनी काँग्रेसने दिलेली गॅरंटी निश्चित पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त केला.