बेळगाव :
शिवजयंती चित्ररथ मिरवणूक शनिवार दि. २७ मे रोजी काढली जाणार आहे. जिवंत देखावे, लाठी मेळा,ढोल-ताशा, ध्वजपथक, लेझीम मेळा, हत्ती-घोडे अशा शिवमय वातावरणात चित्ररथ मिरवणूक काढली जाणार आहे. यासाठी शिवभक्तांकडून तसेच युवक मंडळांकडून जय्यत तयारी केली जात आहे.
अवघे बारा दिवस शिल्लक राहिल्याने साहित्याची जमवाजमव, शिवचरित्रावरील प्रसंग सादरीकरणासाठी पात्रांची निवड करण्यासाठी युवावर्गाची धडपड सुरू झाली आहे. बेळगावची ऐतिहासिक शिवजयंती ही महाराष्ट्रासह गोवा व कर्नाटकातही प्रसिद्ध आहे. अक्षय्य तृतियेच्या दिवशी पारंपरिक शिवजन्मोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी भव्य अशी चित्ररथ मिरवणूक काढली जाते.
परंतु, यावर्षी कर्नाटक विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्यामुळे प्रशासनाने निवडणुका पार पडल्यानंतर चित्ररथ मिरवणूक काढा आम्ही सहकार्य करू, असे आवाहन केल्याने शिवजयंती उत्सव महामंडळाने शनिवार दि. २७ मे रोजी चित्ररथ मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला.
शनिवार दि. १३ रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वजण शिवजयंतीच्या तयारीला लागले आहेत. शिवजयंती चित्ररथ मिरवणूक जवळ आल्याने वाहनांची चेसी मिळविण्यासाठी धडपड सुरू आहे.पूर्वीप्रमाणे वाहनांची चेसी बांधणीसाठी बेळगावात येत नसल्याने जुन्या वाहनांच्या चेसी वापरण्याची वेळ मंडळांवर आली आहे. काही मंडळांनी यापूर्वीच चेसी बुकिंग केल्या असल्याने परगावाहून चेसी आणाव्या लागणार आहेत.
शिवजयंती चित्ररथ मिरवणूक भव्यदिव्य होण्यामागे ढोलताशा, लाठी मेळा, ध्वजपथक लेझीम मेळा, दांडपट्टा यांचा सहभाग मोठा असतो. चित्ररथ मिरवणुकीपूर्वी सर्वच मंडळे याच्या तयारीला लागतात. यामुळे सध्या खुल्या मैदानांवर ढोलताशांचा गजर घुमू लागला आहे.