बेळगाव :
बेळगाव उन्हाळी सुटीनंतर कर्नाटकातील शाळा सोमवार दि. २९ मे पासून पुन्हा सुरू होणार आहेत.शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना सर्व पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याची तयारी शालेय शिक्षण विभागाने केली आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच शाळांमध्ये पाठ्यपुस्तके पोहोचली आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशीविद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत.
मागील वर्षी पाठ्यपुस्तकांतील मजकुरांबाबत वाद निर्माण झाल्याने पुस्तक छपाईला विलंब झाला होता. यामुळे शैक्षणिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्यात आली. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, यासाठी एप्रिल महिन्यातच संबंधित शाळांमध्ये पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले होते. सोमवार दि. २९ पासून शाळा सुरू होणार असून या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत. सर्व सरकारी शाळांमध्ये पहिल्याच दिवशी पाठ्यपुस्तके दिली जाणार असल्याने विद्यार्थ्यांमध्येही उत्सुकता आहे.
गणवेश-बूट वितरणही लवकरच पाठ्यपुस्तकांसोबतचं मागील वर्षी गणवेशाचे वितरणही झाले नाही. राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी निधी राखीव ठेवूनही विद्यार्थ्यांना वेळेत गणवेश मिळाला नाही. काही शाळांच्या विद्यार्थ्यांना एक जोड गणवेश मिळाले तर काहींना गणवेशच उपलब्ध झाले नाहीत. यावर्षी सरकारी शाळांमधील प्रत्येक विद्यार्थ्याला दोन जोड गणवेश त्याचबरोबर शाळा सुरू झाल्याच्या काही दिवसातच बूटही दिले जाणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.