बेंगळुरु :
देशात लक्षवेधी ठरलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज (दि. 10) सायंकाळी 5 वाजेपर्यंत 65.69 टक्के मतदान झाले. राज्यभरातील 58 हजार 545 मतदान केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणूकीमध्ये 5 कोटी 31 लाख 33 हजार 54 मतदार नोंदणी आहे. 224 विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारांचे भवितव्य मतदान पेटीत बंद झाले आहे.
निवडणूक निकाल 13 मे रोजी लागणार आहे. भाजप आणि काँग्रेसमध्ये मुख्य लढत होत असल्याने भाजप सत्ता राखणार की काँग्रेस बाजी मारणार याकडे आता लक्ष लागले आहे.कर्नाटकात विधानसभेच्या सर्व 224 जागांसाठी मतदान पार पडले. निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने कडक सुरक्षा व्यवस्था केली होती.
यावेळी निवडणूक लढविणाऱ्यांमध्ये अनेक दिग्गज नेते आहेत. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई स्वतः निवडणूक रिंगणात आहेत.याशिवाय माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार, जेडीएस प्रमुख एचडी कुमारस्वामी असे अनेक दिग्गजांचे भवितव्य आज मतपेटीत बंद झाले.
सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली.विधानसभेच्या 224 जागांसाठी मतदान पार पडले. मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. तीव्र ऊन असतानाही मतदारांनी उत्साहात मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. विशेष म्हणजे मतदान केंद्रांवर महिलांची देखील लक्षणीय संख्या होती. सकाळी 9 पर्यंत पहिल्या दोन तासात 8.21 टक्के मतदान झाले होते. तर सकाळी 11 वाजेपर्यंत 20.94 टक्के मतदान झाले होते.