बेळगाव :
अवधूत सांप्रदायाचे प्रणेते सद्गुरू श्रीपंत महाराज बाळेकुंद्री यांच्या श्रीक्षेत्र पंतबाळेकुंद्रीत श्रीपंत महाराज व सौ. यमुनाक्का यांच्या विवाह सोहळ्याचे औचित्य साधून ४ ते ६ मे २०२३ या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरूवार ४ ते ६ मे या कालावधीत दररोज सकाळी ५.३० ते ७.३० यावेळेत प्रातस्मरण सद्गुरूचे हा श्रीदत्त प्रेमलहरीतील पदे व पारंपरिक पंचपदीचा कार्यक्रम ऑफलाईन पध्दतीने होणार असून, ४ मे रोजी नृसिंह जयंती असल्याने त्या प्रातस्मरण सद्गुरूचे या कार्यक्रमात नृसिंह हा उल्लेख असलेली पदे म्हटली जातील. ५ मे रोजी ९४ वे व ६ मे रोजी ९५ वे सत्र संपन्न होणार आहे.
या दोन दिवसीय बोधसत्रात प्रेमतरंग या नवीन ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते होणार असून या शिबिरात प्रेमतरंगावरच अभ्यास व चर्चासत्र आयोजित केले आहे. या दोन दिवसात परमपूज्य अभिजित पंतबाळेकुंद्री, डॉ. शलाका म्हामुणकर, दत्ता शेलार, दिनेश सुर्वे, बबन कदम, वंदन जोशी, पुंडलिक रक्ताडे, ज्ञानदेव पुंगावकर, मनिष महाजन, डॉ. संजय भगत, सुहास सातोस्कर यांचे प्रेमतरंगावर अभ्यासपूर्ण विवेचन ऐकण्याची संधी उपलब्ध होणार आहे.