बेळगाव :
दि. २१ एप्रिल रोजी बेळगाव उत्तर मतदारसंघाची निवडणूक नियोजन बैठक रामलिंग खिंड गल्ली येथील उत्तर मतदार संघाच्या निवडणूक प्रचार कार्यालयात घेण्यात आली. सदर बैठकीत प्रचार मार्ग,प्रचार सभा तसेच विविध कमिटी स्थापन करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीला उत्तर मतदार संघातील सर्व आजी- माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि निवड कमिटी सदस्यांना बोलवण्यात आले होते आणि त्यांचे विचार जाणून घेण्यात आले.
उत्तर मतदार संघात महाराष्ट्र एकीकरण समितीला यावेळी चांगली संधी तयार झाली असून या मतदार संघावर महाराष्ट्र एकीकरण समितीचा झेंडा रोवण्यासाठी सर्वांनी जोरात काम करण्याचा ठाम निर्धार यावेळी करण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मध्यवर्ती म. ए. समितीचे खजिनदार प्रकाश मरगाळे होते. यावेळी उत्तर मतदार संघाचे समितीचे अधिकृत उमेदवार श्री. अमर येळ्ळूरकर यांना निवडून आणण्यासाठी सर्व ताकदीनिशी कार्य केले पाहिजे असे ठरविण्यात आले. तसेच दिनांक २२ रोजी उत्तर मतदार संघाच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन ठीक ६ वाजता करणार असल्याचे नियोजन देखील करण्यात आले.