बेळगाव:
भाजप कार्यालयात सोमवारी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत अनिल बेनके म्हणाले, मी कोणत्याही समाजावर अन्याय न करता, जात-पात, वर्ण, पंथ यांचा विचार न करता प्रामाणिकपणे काम केले आहे. मात्र भाजपच्या हायकमांडने या क्षेत्रात बदल केला. रवी पाटील यांना उमेदवारी दिली आहे. सर्वांनी डॉ. रवी पाटील यांना विजयी करायचे हे निश्चित झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून अनिल बेनके वेगवेगळ्या पक्षातून निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या येत होत्या, मात्र त्या सर्व खोट्या आहेत असे ते म्हणाले.
गेल्या 30 वर्षांपासून कार्यकर्त्यांना संघटित करून भाजपच्या विजयासाठी प्रयत्न केले . 2018 मध्ये पक्षाने माझी उमेदवार म्हणून घोषणा केली, जातीभेद विसरून बेळगाव उत्तर मतदारसंघातील जनतेने मला विजयी केले. यापूर्वी दोनदा तिकीट हुकल्यावरही मी पक्ष सोडला नाही. वैयक्तिकरित्या माझ्यावर अन्याय आहे हे खरे पण मी पक्षाचा निष्ठावान कार्यकर्ता आहे.
बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील म्हणाले, आज दुपारी माझा व उत्तरचे उमेदवार डॉ. रवी पाटील यांचे उमेदवारी अर्ज भरणार आहोत. भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर बेळगाव तालुक्यातील बेळगाव उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण या तिन्ही मतदारसंघात भाजप विजयी होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकार परिषदेला महाराष्ट्राचे मंत्री व बेळगाव निवडणूक प्रभारी गिरीश महाजन, खा. मंगल अंगडी, भाजपचे उमेदवार डॉ. रवी पाटील आदी उपस्थित होते.