खानापूर मतदारसंघात बंडखोरी….
खानापूर :
कर्नाटक राज्याच्या सन २०२३ सालच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आणि खानापूर मतदारसंघातून सर्वच पक्षातील उमेदवार बंडखोरीचे अस्त्र उभारण्याचे लक्षणं यंदाच्या निवडणुकीत दिसुन येत आहे.
तालुक्यात काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराचे सर्व प्रथम नाव जाहीर झाले. तसे अंजली निंबाळकर यांनी प्रचाराला प्रारंभ केला. मात्र काँग्रेस युवा नेते इरफान तालिकोटी यांनी काँग्रेस पक्षात बंडखोरी करून गुरूवारी दि. १३ रोजी आपल्या कार्यालयाचे उद्घाटन केले. त्यामुळे खानापूर काँग्रेस पक्षात पुन्हा दोन उमेदवार उभे राहिले. मागील निवडणुकीत काँग्रेस पक्षाचा उमेदवार विजयी झाला होता. मात्र यंदा पक्षातच बंडखोरी झाल्याने दोन उमेदवार झाल्याने काँग्रेस यशाची खात्री देता येणार नाही.
जेडीएसचे उमेदवार नासीर बागवान यांना उमेदवारी जाहीर झाली पण त्यांच्या कार्यकर्त्यांतून नाराजी उमटली असून जेडीएसचे ज्येष्ठ नेते रेव्हना सिध्दया हिरेमठ यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नासीर बागवान यांच्यावर अविश्वास दाखवुन पक्षाला रामराम ठोकण्याचा विचार केला आहे. तसेच जेडीएसमध्ये दुसराच उमेदवार निवडणूक लढविण्याच्या तयारीत असल्याचे चर्चिले जात आहे.
भाजपने विठ्ठलराव हलगेकर यांच्या नावाची घोषणा करताच माजी आमदार अरविंद पाटील यांच्या अभिमानी समर्थकांनी लागलीच बुधवारी दि. १२ रोजी बैठकीचे आयोजन करून वेळ आल्यास बंडखोरी करून निवडणूक लढविण्याचे आवाहन समर्थकांनी केले आहे. दोन दिवसाच वेळ दिला आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार म्हणून मुरलीधर पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
मात्र समितीच्या दुसऱ्या गटातून माजी सभापती सुरेश देसाई तोपिनकट्टी हे उमेदवारीसाठी इच्छूक असल्याचे खानापूर तालुक्यात चर्चिले जात आहे. त्यामुळे खानापूर तालुक्यात महाराष्ट्र एकीकरण समितीतर्ह बंडखोरी होण्याची चिन्हे दिसत आहेत. इतर शिवसेना अथवा आम आदमी पक्षात, जनता पार्टी कर्नाटक आदी पक्षात अद्याप बंडखोरीचा अंदाज अद्याप दिसत नाही. त्यामुळे खानापूरात बंडखोरीची डोकेदुखी सर्वच पक्षाला त्रासाची होणार आहे. यात शंका नाही.