बेळगाव:
बेळगाव दक्षिण मतदारसंघात अधिकृत उमेदवार निवडीसाठी शहर म. ए. समितीने निवड समितीची रचना केली आहे. त्यामुळे मंगळवारी (दि.10) निवड समितीची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीनंतर लगेचच इच्छुकांच्या मुलाखती घेऊन उमेदवार निवडीच्या प्रक्रियेला वेग देण्यात येणार आहे. गेल्या चार दिवसांपासून बेळगाव दक्षिण मतदारसंघातील निवड समिती रचना करण्याचे काम सुरू होते. आज अंतिम समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीची मंगळवारी बैठक होणार आहे. त्या बैठकीला इच्छुक आठ उमेदवारांना बोलावण्यात येणार आहे. त्यानंतर लगेचच त्यांच्या मुलाखती घेऊन निवड प्रक्रियेला चालना देण्यात येणार आहे. इच्छुकांच्या मुलाखतीनंतर दोन दिवस जनमाणसांचा कौल आजमावण्यात येणार आहे. त्यानंतर अधिकृत उमेदवारांच्या घोषणेची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशी माहिती निवड समिती अध्यक्ष नेताजी जाधव यांनी दिली.