निपाणी :
सध्या होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपली प्रकृती साथ देईल की नाही या संभ्रमावस्थेमुळे आपण उमेदवारी नाकारली होती.काँग्रेसचे नेते मंडळी आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव ही निवडणूक लढवणार आहोत. त्यासाठी अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला उमेदवारी जाहीर केली असून आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे, असे मत माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी व्यक्त केले.
गुरुवारी (ता. ६) सायंकाळी आयोजित पत्रकार बैठकीत ते बोलत होते.काकासाहेब पाटील म्हणाले, चाळीस वर्षांमध्ये काँग्रेस पक्षाचे निष्ठेने काम केले आहे. माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्यासह नेते मंडळींनी आपल्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार ही उमेदवारी मिळाली आहे.
शिवाय ही उमेदवारी योग्य असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, कर्नाटक प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रणजीत सिंह सुरजेवाला, अखिल भारतीय काँग्रेसचे सेक्रेटरी विश्वनाथन, केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी, माजी मंत्री कुमार पाटील जिल्हा काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, निपाणी भागातील काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, नेते मंडळी आणि कट्टर कार्यकर्त्यांनी पटवून दिले. सर्वसामान्य व्यक्ती केंद्रबिंदू म्हणून विकास कामे केली आहेत. याची जाणीव सर्वांनाच असल्याने कार्यकर्त्यांच्या जीवावरच ही निवडणूक लढवीत आहे.
माजी मंत्री वीकुमार पाटील यांनी, काँग्रेस सोडून गेलेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली एकत्रित यावे. काँग्रेस पक्षामध्ये बंडाळी नसून बेरजेचे राजकारण करण्यासाठी सर्वांनी कार्यरत राहण्याचे आवाहन केले.
यावेळी माजी जिल्हा पंचायत सदस्य पंकज पाटील, अण्णासाहेब हवले, उद्योजक रोहन साळवे, निपाणी भाग काँग्रेस अध्यक्ष राजेश कदम, बेडकिहाळ भाग काँग्रेस अध्यक्ष बसवराज पाटील, शंकरदादा पाटील, विजय शेटके, किरण कोकरे, अशोक पाटील, संदीप कामत, युवराज पोळ, विश्वास पाटील, प्रशांत नाईक, निकु पाटील, वसंत धारव, गजेंद्र पोळ, सिताराम पाटील, महेश पाटील, दत्ता पाटील, शशि पाटील यांच्यासह शहर व परिसरातील कार्यकर्ते उपस्थित होते.
Like 0