कोगनोळी :
येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी टोल नाक्यावर कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उभारण्यात आलेल्या तपासणी नाक्यामध्ये १ कोटी ५० लाख रुपये सापडल्याची घटना बुधवारी रात्री ११ च्या सुमारास घडली. अशोक गंगाधरशेठ या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवर असणाऱ्या कोगनोळी तपासणी नाक्यावर मुंबईहून बेंगलोरकडे जात असणाऱ्या आनंदा ट्रॅव्हल्स बसची तपासणी करण्यात आली. यावेळी बसमध्ये असणाऱ्या अशोक गंगाधरशेठ यांच्याकडे १ कोटी ५० लाख रुपये असल्याचे निदर्शनास आले. तात्काळ रोख रक्कम व गंगाधर शेठ यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पंचनामा केला. यावेळी ही रक्कम सोने-चांदी व्यापाऱ्याची असून आपण फक्त रक्कम पोच करण्याचे काम आहे असे त्यांनी सांगितले.
निपाणी ग्रामीण पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक प्रवीण गंगोळ, उपनिरीक्षक कृष्णा नाईक, उपनिरीक्षक रेवांना गुरीकार, रमेश तलवार, संजय बारवाडकर, संजय खोत, महेश सांगावे, किरण पुजारी, शिवानंद चिकमट, शिवप्रसाद कडगनावर आदी कर्मचारी उपस्थित होते.एक नजर या ठिकाणी जप्त करण्यात आलेले १ कोटी ५० लाख रुपये साध्या व मळकटलेल्या पिशवीत होते. पिशवीकडे पाहिले असता यामध्ये इतकी मोठी रक्कम असेल असे कोणालाही वाटणार नाही. तपासणी केली असता पिशवीमध्ये मोठी रक्कम सापडली.