मुंबई :
कर्नाटक व्याप्त सीमा भागातील 865 गावांतील मराठी भाषिकांना शिवसेना आणि भाजप सरकारने मोठा दिलासा दिला आहे. या गावातील मराठी कुटुंबांतील लाभार्थ्यांना महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना लागू करण्यास सरकारने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे मूत्रपिंड प्रत्यारोपणाबरोबरच तब्बल 996 उपचारांचा लाभ घेता येणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र-कर्नाटक सीमा भागातील महाराष्ट्र शासनाने दावा सांगितलेल्या बेळगांव, कारवार, गुलबर्गा व बिदर जिल्ह्यांतील 12 तहसीलमधील 865 गावांतील अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य गटातील कुटुंबे व अन्नपूर्णा शिधापत्रिकाधारक कुटुंबांचा समावेश महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये करण्यास मान्यता देण्यात आली आहे. या योजनेत काही बदल झाल्यास या गावातील लाभार्थी कुटुंबांना ते लागू होणार आहेत. यासंदर्भात राज्य सरकारने सोमवारी शासन निर्णय जारी केला आहे.