शहापूर बसवण्णा देवाची यात्रा उत्साहात.
बेळगाव:
शहापूर खडेबाजारमधील प्राचीन बसवण्णा महादेव देवाची वार्षिक यात्रा शुक्रवारी सायंकाळी भक्तिभावाने पार पडली.यानिमित्त दिवसभर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. हजारो भाविकांनी दिवसभर मंदिरात श्रीफळ, फुले, कापूर, उदबत्त्या आदी पूजा साहित्य घेऊन दर्शनासाठी गर्दी केली होती.
सायंकाळी मंदिरासमोर इंगळ्या न्हाणे कार्यक्रम उत्साहात पार पडला. हजारो भाविकांनी पेटत्या निखाऱ्यांवरून इंगळ्या पार केल्या.
यावेळी बसवण्णा देवाचा पालखी सोहळाही पार पडला. शहापूरसह खासबाग, वडगाव, बेळगाव आदी परिसरातील हजारो भाविकांनी यावेळी उपस्थिती लावली होती.