सामाजिक न्यायासाठी २० विरोधी पक्ष चेन्नईत एकत्र येणार एमके स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखाली चेन्नईत विरोधकांची मोट बांधण्याचा प्रयत्न
नवी दिल्ली :
तामिळनाडूचे मुख्यमंत्री आणि द्रमुक पक्षाचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांनी भाजपाविरोधी पक्षांना एकत्र करून सोमवारी (दि. ३ एप्रिल) चेन्नई येथे सामाजिक न्याय परिषद आयोजित केली आहे. विविध राज्यात भाजपाच्या विरोधात असलेल्या पक्षांना या परिषदेसाठी निमंत्रित केले असल्याचे द्रमुकमधील सूत्रांनी सांगितले. या बैठकीला ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बिजू जनता दल आणि आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस पक्षाला देखील निमंत्रित केल्याची माहिती मिळत आहे. या दोन्ही पक्षांनी आजवर भाजपाच्या विरोधात उघडपणे विरोधकांशी हातमिळवणी केली नव्हती. मात्र YSRCP या परिषदेचे निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांच्यावतीने कुणीही परिषदेला उपस्थित राहणार नाही. तसेच बिजू जनता दलानेही निमंत्रण मिळाले नसल्याचे सांगितले.
भारतातील सामाजिक न्याय पुढे नेणे” अशी या सामाजिक न्याय परिषदेची संकल्पना ठरविण्यात आली आहे. एमके स्टॅलिन मुख्य वक्ते असतील तर इतर पक्षातील काही निवडक नेत्यांना त्यांची भूमिका मांडण्यासाठी वेळ देण्यात येणार आहे. अखिल भारतीय सामाजिक न्याय संघटनेच्या नावाने ही परिषद भरविण्यात आली आहे. ज्याची संकल्पना स्वतः स्टॅलिन यांनी जानेवारी महिन्यात मांडली होती. द्रमुकने पुढाकार घेतलेल्या या परिषदेला काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय जनता दल, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, भारत राष्ट्र समिती, कम्युनिस्ट पक्ष, सीपीआय (एम), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आम आदमी पक्ष, इंडियन युनियन मुस्लिम लीग, एमडीएमके हे पक्ष सहभागी होणार आहेत.
झारखंड मुक्ती मोर्चाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री हेमंत सोरेन, आरजेडीकडून बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, सपाचे प्रमुख आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनीदेखील परिषदेला उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे.