मेणसी गल्लीत शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला आग
बेळगाव : शॉर्ट सर्किटमुळे मेणसी गल्ली येथील उत्तम नोव्हेल्टी या दुकानाला आग लागून स्टेशनरीसह सजावटीचे साहित्य वगैरे जळून भस्मसात झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज सोमवारी सकाळी घडली. आगीमुळे नुकसान झालेले उत्तम नोव्हेल्टी हे दुकान महिपाल सिंग यांच्या मालकीचे आहे.
शहरातील मेणसी गल्ली येथे मुख्य रस्त्याला लागून आत गेलेल्या बोळ सदृश्य रस्त्यावर छोट्या दुकानांची रांग आहे. या दुकानांपैकी उत्तम नोव्हेल्टी या दुकानाला आज सकाळी 8 ते 9 दरम्यान शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या आणि आसपासच्या नागरिकांनी दुकानातून धूर येत असल्याचे पाहून आगीची माहिती अग्निशामक दलाला दिली. सदर माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याच्या बंबासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
आग आसपासच्या दुकानात पसरण्याचा धोका असल्यामुळे घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी पाण्याच्या जोरदार फवाऱ्याद्वारे नोव्हेल्टी दुकानातील आग आटोक्यात आणली. मात्र तोपर्यंत दुकानातील स्टेशनरीसह सजावटीचे साहित्य वगैरे सर्व कांही आगीत भस्मसात होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले होते.मार्केट पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.