दहावीची परीक्षा ३१ मार्चपासून
बेळगाव : दहावीची परीक्षा अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपली आहे. शिक्षण खात्याने परीक्षेची तयारी पूर्ण केली आहे. परीक्षा केंद्रांवर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याची सूचना केंद्रप्रमुखांना करण्यात आली आहे.
बेळगाव शैक्षणिक. जिल्ह्यातील १२० परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा होणार आहे. बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यातील ३३ हजार १८२ विद्यार्थी परीक्षा देणार असून यापैकी ३१ हजार ९३८ विद्यार्थी फ्रेश आहेत. तर १,११४ विद्यार्थी रिपीटर्स आहेत. ३१ मार्चपासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात होणार आहे.
परीक्षा काळात कोणत्याही प्रकारचा गोंधळ होऊ नये यासाठी दोन दिवसापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी व परीक्षा केंद्र प्रमुखांची बैठक घेतली होती. यावेळी परीक्षेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला होता. परीक्षेवेळी सर्व केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर अर्धा तास अगोदर उपस्थित राहण्याची सूचना करण्यात आली आहे.
कोरोना संकटामुळे गेली दोन वर्षे दहावीच्या परीक्षेत बदल करण्यात आला होता. तसेच सोप्या प्रश्नांची संख्या वाढविण्यात आली होती. मात्र, पुन्हा जुन्या पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. त्यानुसार कठीण प्रश्नांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्याप्रकारे अभ्यास करून परीक्षा द्यावी लागणार आहे.