कोगनोळीत तयार झालेल्या पुतळ्याचे रविवारी अमित शहांच्या हस्ते उद्घाटन
निपाणी : कोगनोळी येथील प्रसिद्ध मुर्तीकार, शिल्पकार अमित डोंगरसाने यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांचा 11फूट उंचीचा ब्राँझ धातूचा पुतळा तयार केला असुन नुकताच तो कर्नाटकातील बिदर तालुक्यातील गोरटा या गावी रवाना झाला. त्याचे उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा,कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते रविवार दिनांक 26 मार्च रोजी होणार आहे. कोगनोळीत तयार झालेल्या पुतळ्याचे अमित शहांच्या हस्ते उद्घाटन होणार असल्याने कोगनोळीकरांची मान अभिमानाने उंचावली आहे.
कोगनोळीतील अॅकॅडमी शेजारीच शिल्पकार डोंगरसानेयांचा स्टूडिओ असुन आतापर्यंत त्यांनी विविध राष्ट्रपुराषांचे शेकडो पुतळे हुबेहूब साकारलेले आहेत.याठिकाणीच सदरचा पुतळा अवघ्या 26 दिवसात तयार केला असुन तो ब्राँझ (कंचलोह) धातूचा असुन वजन 1 टन आहे. विजापूर ते गोरटा अशी तब्बल 250 किलोमीटरची रॅलीने पुतळा गोरटा मध्ये बसवण्यात आला. 19 वेगवेगळ्या मतदार संघातील आमदार, खासदार, मंत्रीयांनी आपापल्या मतदारसंघांत पुतळ्याचे पुष्पहार घालून घोषणा देत जल्लोषी स्वागत केले.सदरचा पुतळा तयार करण्यासाठी मुर्तीकार अमित डोंगरसाने यांच्या बरोबर त्यांच्या पत्नी मुर्तीकार सोनालीडोंगरसाने व सहकारी यांनी विशेष मेहनत घेतली.