कांगली गल्लीत शॉर्टसर्किटमुळे घराला आग
बेळगाव : कांगली गल्लीतील एका घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागून सुमारे 20 लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे.सुदैवानेच या घटनेत जीवितहानी टळली.बेळगावच्या मध्यवर्ती भागातील कांगली गल्लीतील ठाकूर कुटुंबियांच्या जुन्या राहत्या घराला आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अचानक शॉर्टसर्किटने आग लागली.या इमारतीत वरच्या मजल्यावर ठाकूर कुटुंबीय राहतात, तर खाली रस्त्याला लागून त्यांचा फोटो स्टुडिओ आणि भाड्याने दिलेली दोन दुकाने आहेत. त्यांनाही या आगीची मोठी झळ बसली. पाहता-पाहता आगीने रौद्र रूप धारण केले. सुदैवाने ठाकूर कुटुंबीय लागलीच घराबाहेर पडल्याने जीवितहानी झाली नाही. मात्र घरातील संसारोपयोगी साहित्य जळून भस्मसात झाल्याने ठाकूर कुटुंबियांचे मोठे नुकसान झाले. या आगीत घरातील प्रापंचिक साहित्य, कपडे, इलेक्ट्रिकल वस्तू व अन्य साहित्य जळून खाक झाले. देवघर आणि भिंतींनाही आगीची झळ बसली. एवढे नाही तर खिडक्या आणि आतील दरवाजेदेखील कोळसा होऊन गेले. उन्हाच्या तडाख्याने काही वेळातच आगीने संपूर्ण घराला विळखा घातला. आगीच्या ज्वाला आणि धुराचे लोट आकाशात उंचावरून दिसून येत होते. नागरिकांनी पोलीस आणि अग्निशामक दलाला पाचारण केले. दोन्ही दले तातडीने घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी अथक प्रयत्नांनी आगीवर नियंत्रण मिळवले.