राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण
बेळगाव :
देशाचे अद्वितीय नेते आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शौर्याने लढा देणारे छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवताना आनंद होत आहे. राजहंसगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी ५ कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले.
गुरुवारी (२ मार्च) जिल्हा प्रशासन, कन्नड आणि संस्कृती विभाग आणि केआरआयडीएल, पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राजहंसगड किल्ला परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण करताना ते बोलत होते.
या अनुदानाचा उपयोग राजहंसगड किल्ल्याच्या विकासासाठी कम्युनिटी हॉल, विश्रामगृह व इतर मुलभूत सुविधा बांधून पर्यटनस्थळात रूपांतरित करण्यासाठी केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय पाटील यांच्या प्रयत्नातून किल्ल्याच्या परिसरात पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अनुदान जाहीर करण्यात आले. किल्ल्याच्या विकासासाठी आधीच राखून ठेवलेल्या अनुदानाव्यतिरिक्त ५ कोटींचे अतिरिक्त अनुदान देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
राजहंस हा अप्रतिम किल्ला आहे. शिवाजी महाराजांचे गतवैभव आणि संस्कृती जपणारा हा किल्ला आहे.शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वानुसार मूर्तीची प्रतिष्ठापनाकरण्यात आली आहे. आगामी काळात गडाचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.