खानापूरात 2 मार्चपासून भाजपाचे मिशन विजय संकल्प अभियान,राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत
खानापूर :
भाजपातर्फे संपुर्ण देशात विजय संकल्प अभियान राबविण्यात येत आहे. खानापूर तालुक्यात येत्या 2 मार्च पासून भाजपाचे मिशन विजय संकल्प अभियानाची सुरवात संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नंदगड येथून होणार आहे, असे भाजपाचे राज्य उपाध्यक्ष निर्मलकुमार सुराणा यांनी सांगितले.
नंदगड येथे झालेल्या पूर्वतायरीच्या बैठकीत त्यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या.आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या विजय संकल्प यात्रेची सुरुवात वीरभूमी नंदगड (ता. खानापूर) येथून 2 मार्च रोजी सकाळी 9 वाजता केली जाणार आहे. या यात्रेच्या उद्घाटनासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, ज्येष्ठ नेते बी. एस. येडीयुरप्पा, भाजपा राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील आदी उपस्थित राहणार आहेत.
राज्यभरात फिरणारी ही विजय संकल्प यात्रा यशस्वी करण्यासाठी खानापूर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा पंचायत क्षेत्रातून किमान 5000 नागरिक उपस्थित राहतील याची दक्षता कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी घ्यावी, असे आवाहन जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील यांनी केले.
नंदगड येथील मार्केटिंग सोसायटीच्या सभागृहात भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष माजी आमदार संजय पाटील,माजी विधानपरिषद सदस्य अरुण शहापूर, तालुका अध्यक्ष संजय कुबल, माजी जिल्हा पंचायत सदस्य बाबुराव देसाई, भाजपा नेते विठ्ठल हलगेकर, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, राज्य कार्यकारिणी सदस्या धनश्री सरदेसाई, वन निगम संचालक सुरेश देसाई, गुंडू तोपिनकट्टी, बसवराज सानिकोप, किरण येळ्ळूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.