शिवजयंती कार्यक्रमाच्या निमंत्रणपत्रिकेवर महापौरांना
दुय्यम स्थान!
बेळगाव : बेळगाव जिल्हा प्रशासन व महापालिकेतर्फे
रविवारी (ता. 19) आयोजित शिवजयंती कार्यक्रमाच्या
निमंत्रणपत्रिकेवर शहराच्या नूतन महापौर शोभा सोमणाचे
यांना दुय्यम स्थान देण्यात आले आहे. तर उपमहापौर
रेश्मा पाटील यांचे नावच निमंत्रणपत्रिकेत नाही.
19 फेब्रुवारी रोजी प्रशासनातर्फे शिवजयंती साजरी करण्यात
येणार आहे. या कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका
नगरसेवकांना पाठवण्यात आली आहे. शिवजयंती
कार्यक्रम शहापूर येथील शिवाजी उद्यानात होणार आहे.
महापौर या शहराच्या प्रथम नागरिक असतात.
उपमहापौरांनाही हा शिष्टाचार लागू पडतो. पण
निमंत्रितांच्या यादीमुळे मराठी भाषिक नगरसेवकांसह
बेळगावकरांतून नाराजी व्यक्त होत आहे. कर्नाटकात
2012 पासून 19 फेब्रुवारी रोजी शासकीय पातळीवर
शिवजयंती साजरी केली जात आहे. त्यानुसार जिल्हा
प्रशासन, जिल्हा पंचायत, कन्नड व संस्कृती खाते व
महापालिकेकडून यंदाही 19 रोजी बेळगावात विविध
कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या
कार्यक्रमासाठी विशेष निमंत्रितांच्या यादीत महापालिका
आयुक्त डॉ. रुद्रेश घाळी यांचे नाव आहे. मान्यवरांच्या
यादीत त्यांना स्थान देण्यात आले आहे. पण,
महापौरांबाबत पक्षपाती भूमिका घेण्यात आली आहे.
याशिवाय या पत्रिकेत जिल्ह्यातील सर्व आमदार, खासदार,
विधान परिषद सदस्य, राज्यसभा सदस्य, विविध
महामंडळाचे अध्यक्ष, बुडा अध्यक्ष, काडा अध्यक्ष आदींची
नावे आहेत. त्यानंतर सर्वात शेवटी महापौर शोभा
सोमणाचे यांचे नाव घेण्यात आले आहे तर उपमहापौर
रेशमा पाटील यांच्या नावाचा उल्लेखही नाही.