राजकीय प्रभावाखाली श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे :रमाकांत कोंडुसकर यांचा आरोप
बेळगाव : बेळगावातील दक्षिण विभागात असलेल्या पोलिसस्थानकांचे अधिकारी हे आमदारांच्या मर्जीनुसार मनमानी कारभार करत आहेत. तसेच गांजा सारख्या नशिल्या पदार्थांच्या विक्रीला प्रोत्साहन देत आहेत, असा आरोप श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी केला आहे.
यासंदर्भात मंगळवारी सकाळी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी आपले म्हणणे मांडले. तसेच आरपीडी कॉर्नर येथे होणाऱ्या गांजा विक्री प्रकरणात टिळकवाडी पोलिसांनी हे प्रकरण दडपून टाकले असल्याची माहिती दिली.
दक्षिण विभागातील पोलीस स्थानकांमध्ये श्रीराम सेनेच्या कार्यकर्त्यांवर खोट्या केसीस दाखल करण्याची कामगिरी सुरू आहे. राजकीय पाठबळाच्या जोरावर पोलीस यंत्रणा मनमानी करीत आहे. याविरोधात आता श्रीराम सेना हिंदुस्थान प्रखर आंदोलन छेडण्याच्या तयारीत आहे. येत्या काही दिवसात भव्य मोर्चा काढून प्रशासनाला जागे करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.