नेपाळमध्ये विमान दुर्घटनेत भारतीयांसह ७२ जणांचा दुर्दैवी अंत
काठमांडू वृत्तसंस्था
नेपाळच्या पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळानजीक ७२ लोक घेऊन जाणारे विमान अपघातग्रस्त झालं आहे. या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांचा मृत्यू झाला आहे. या विमानात ६८ प्रवाशी आणि चार क्रू सदस्य होते. एटीआर-७२ हे प्रवासी विमान ७२ जणांना घेऊन काठमांडू ते पोखरा या मार्गावर होते. या विमानाने आज सकाळी साडेदहा वाजता त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाण केलं होतं.
पोखरा विमानतळावर लँडिंग करण्याच्या दहा सेकंद आधी हे विमान अपघातग्रस्त झाले आहेत. या विमानातील सर्वजण मृत पावल्याचं वृत्त इंडिया टुडेनं दिलं आहे. हे विमान पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळापासून काही अंतरावर असणाऱ्या सेती गंडकी नदीच्या काठावरील जंगलात कोसळलं.
हे विमान अपघातग्रस्त होताच विमानाला भीषण आग लागली. बचाव दलाचे कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. या विमानात ११ परदेशी पर्यटकांसह तीन नवजात मुलं होती. अपघाताच्या वेळी विमानात ५३ नेपाळी, पाच भारतीय, चार रशियन, एक आयरिश नागरिक, दोन कोरियन, एक अर्जेंटिनाचा आणि एक फ्रेंच नागरिक होता,” अशी माहिती विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली.