सिन्नर-शिर्डी महामार्गावर बस-
ट्रकचा भीषण अपघात; 10 ठार
सिन्नर : सिन्नर- शिर्डी महामार्गावर पाथरे शिवारात ईशानेश्वर
मंदिराच्या कमानीजवळ भीषण अपघात झाला आहे.
खाजगी आराम बस व ट्रकची समोरासमोर धडक होऊन हा
भीषण अपघात झाला. या अपघातात तब्बल 10 जण ठार
झाले आहेत. तर 17 जण गंभीर जखमी आहेत.
मुंबई येथून शिर्डीकडे जाणारी खाजगी आराम बस (क्रमांक
एम एच ०४ एसके 27 51) व शिर्डी बाजू कडून सिन्नर
बाजूकडे जाणारा माल ट्रक (क्रमांक एम एच 48 टी 12
95) यांची समोरासमोर धडक झाल्याने अपघात घडला.
पाथरे ते पिंपळवाडी येथील टोलनाके दरम्यान एकेरी
वाहतूक सुरू होती. अंबरनाथ ठाणे परिसरातील सुमारे 50
प्रवासी या बसमधून शिर्डीकडे प्रवास करत होते.
अपघातग्रस्त खाजगी आराम बस उल्हासनगर येथून 15 बस
साई दर्शनासाठी निघालेल्या होत्या. प्रवासी यादीनुसार
बसमध्ये काही प्रवासी नव्हते, बस चहा पाण्यासाठी
थांबल्यावर बस बदलून बसले होते.
त्यामुळे मृतांची नावे व बसमधील प्रवाशांची नावे कळण्यास
उशीर लागेल. गाईड ट्रॅव्हल्स या कंपनीची बस होती. 35 ते
40 प्रवासी उपचाराकरिता सिन्नर येथील खाजगी
रुग्णालयात पाठवण्यात आले त्यात मृतांचा देखील
समावेश आहे.